अशी ही एक सकाळ

          Alarm वाजला आणि जाग आली. किचन मधून काहीसा आवाज येत असूनही तो दुर्लक्ष करून मी फ्रेश झाले. अर्थातच किचनमध्ये आईच असणार. तेवढ्यात तिने हाक मारली आणि कॉफीचा गच्च भरलेला कप हातामध्ये ठेवला आणि तिच्या त्या गोड, सुंदर प्रसन्न चेहऱ्याने  मला म्हणाली "Gooood morningg बाळ". थँक्यू म्हणण्याच्या ऐवजी मी म्हणाले ( स्मित हास्य करत ) " अशीच सकाळ मला रोज हवी आहे". आईने डोक्यावरून हात फिरवला; तिने सुद्धा स्मित हास्य दिलं. 
          मी जिना चढून अर्थात तो कॉफीचा मग सांभाळत हळूच गच्चीवर पोहोचले. गरमागरम कॉफीचा मग, मी आणि सुंदर सकाळ. हाच विचार करत असताना गार वाऱ्याची मंद, हळूवार; केसांना व गालांना जणू हलकासा स्पर्श करणारी ती झुळूक आली आणि मीही ती डोळे मिटून अनुभवली. सुख काय असतं तर हेच असं त्या क्षणी वाटलं. सोबत झाडांच्या पानांचा आवाज येतोय त्यात पक्षांचा किलबिलाट आणि चिमण्यांची चिव चिव तर जास्तच ऐकू येतेय. अशा या आवाजांच्या स्पर्धेमध्ये पूर्वेकडे पाहिलं ; हलकासा तांबडा रंग, अगदी मनाला शांत करणारा आणि तितकाच प्रोत्साहित करणारा सुद्धा. पहाटेची काकडा आरती अजून संपली नव्हती, तो टाळ मृदुंगांचा आवाज कानावर पडताच मनातल्या मनात मीही गुणगुणले " हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी " तिथली गावच्या मंदिरातली ती spritual energy आमच्या कॉलनी मध्ये आणि माझ्यापर्यंत पोहोचतेय. त्यात अधून मधून गाड्यांचा, त्यांच्या हॉर्नचा आवाजही मिसळतोय. पक्षांचे थवे आकाशात उंच उडताना दिसतायेत अशीच उंच भरारी मलाही घ्यायची आहे असं माझं मन मलाच सांगतय. यावेळी माझ्या शरीरामधून फक्त Positivity संचारत होती. आणि त्या पक्षांबरोबर माझं मनही उडू लागलं. हवेत तरंगत असलेल्या मनाला पटकन कोणी खाली खेचावं तसा जोरात आवाज झाला दूsssssssध. मी आणि माझं उडू लागलेलं मन आता वास्तविक आयुष्यामध्ये आलं. मला असं समजलं की peace म्हणजे फक्त शांतता नसते तर तो आवाजही आपला #peace होऊ शकतो. 
          आणि कॉफी थंड झाली. 
 

 

Comments